सप्ताहाच्या कार्यक्रमानंतर आढळले तब्बल 161 कोरोना बाधित; गावात खळबळ.

लातूर दि.11 एप्रिल – लातूर (Latur) तालुक्यातील लिंबाळवाडी येथे धार्मिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गावातील काही भाविक सहभागी झाले होते. दरम्यान, गावातील एका व्यक्तीस कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्ग झाल्याचे चाचणीनंतर स्पष्ट झाले. यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासणी नंतर गावातील तब्बल 161 जणांना कोरोना लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. यात केवळ 22 बाधित व्यक्ती 60 वर्षावरील आहेत.
(A staggering 161 corona infections were found after the week’s event; Excitement in the village.)
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लातूर (Latur) तालुक्यातील लिंबाळवाडी येथे धार्मिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गावातील काही भाविक सहभागी झाले होते. दरम्यान, गावातील एका व्यक्तीस अस्वस्थ वाटत असल्याने कोरोना तपासणी करण्यात आली. यात त्यास कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. दुसऱ्या दिवशी बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यात आली. यात नऊ व्यक्ती कोरोना बाधित (Corona Positive) आढळून आले. दोन दिवसात गावातील 275 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात शुक्रवारपर्यंत 97 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आरोग्य विभागाचे एक पथक गावात नियुक्त करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास हसनाळे व त्यांच्या पथकाने शनिवारी लिंबाळवाडीतील 225 जणांची तपासणी केली असता, त्यात 63 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत 500 जणांची तपासणी करण्यात आली असून, कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या 161 वर पोहोचली आहे. लिंबाळवाडीतील सर्वांची तपासणी करण्यासाठी एक वैद्यकीय पथक गावात तळ ठोकून आहे.
दरम्यान, शासनाने कडक निर्बंध लावलेले असताना ग्रामीण भागांत याची दखल घेतली जात नसल्याचे दिसुन आले. लिंबाळवाडी गावास तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, डॉ. श्रीनिवास हासनाळे, पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट आदी उपस्थित होते. गावातील 60 वर्षांपुढील कोरोना बाधित असलेल्या 22 जणांना चाकूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पंडगे यांनी दिली.