धारूर घाटात ट्रकचा अपघात; तर पहाटे घडली चोरीची घटना.

किल्लेधारूर दि.4 जून – धारूर येथील घाटात अरूंद रस्त्यामुळे नियमीत अपघात (Accident) होण्याची मालिका सुरूच असून गुरूवारी सकाळी अवघड वळणावर बियाणे घेऊन जाणारे ट्रक क्रमांक एम. एच.28 बी 8609 हा पलटी होवून ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. तर गुरुवारी पहाटे घाटपायथ्यावर धावत्या ट्रकमधून चोरी करण्याची घटना घडली असून या प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
(Truck accident in Dharur Ghat; So the theft happened in the morning.)
धारूर घाटातून (Dharur Ghat) गुरूवारी सकाळी लातुरहुन खामगावकडे महाबीज कंपनीच्या सोयाबीनचे बियाणे घेऊन जाणारा ट्रक क्र. एम. एच. 28 बी 8609 हा ट्रक अवघड वळणावर पलटी झाल्याने ट्रकचे मोठे नुकसान झाले. या अपघाताने (Accident) या घाटातील अपघाताची मालीका नियमीत पणे सुरूच असल्याने वाहन चालकात माञ भितीचे वातावरण निर्माण होत आहे.
या ट्रकमध्ये शासकीय बियाणे असल्याने तात्काळ हे बियाणे दुसऱ्या वाहनात सुरक्षीतपणे हलवण्यात आले. या अपघात प्रकरणी धारूर पोलीस स्टेशन मध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सुदैवाने अपघातात जीवितहानी झालेली नाही. मात्र, शासनाने तात्काळ या घाटाचे रखडलेले रुंदीकरण करावे अशी मागणी होत आहे.
पहाटे धारूरच्या घाटात मैदा व हळदीच्या पोत्यांची चोरी; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
धारूर घाटामध्ये पहाटेच्या दरम्यान घाट चढून वर येत असलेल्या ट्रकमधून मैदा व हळदीचे पोते अवघड वळणावर असताना ट्रक मधून चोरी केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपी ताब्यात घेतले आहेत.
धारूर येथील घाट (Dharur Ghat) पायथ्याशी रस्त्याचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक सुरळीत होण्यासाठी वळण रस्ता केलेला आहे. या वळण रस्त्यावरून पहाडी पारगाव येथील ट्रक एम एच 21 एक्स 5399 ही चाकण येथून लातूर कडे मैद्याची पोते घेऊन जात होते. मध्यरात्री ट्रक त्या वळणावर आला असता ट्रकमधील ताडपत्री फाडून त्यातील मैद्याची पोते बाहेर टाकले तसेच पुढे डांबरी रस्ता सुरू झाल्याने आणखी एक पोते बाहेर टाकले.
त्यावेळी धप्पकन आवाज आला. आवाजामुळे कुणीतरी आपल्या गाडीतील मैद्याची पोते काढत आहे हे चालकाच्या लक्षात आली. परंतु भीतीपोटी तो ट्रक वेगाने पळवत चालक घाटाच्या वरती आला. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक गोविंद बास्टे, सय्यद खलील, चालक गोरख खाडे, होमगार्ड मैंद हे पोलिस (Police) वाहनाने गस्त घालण्यासाठी जात होते.
ट्रक चालकांने आपल्या गाडीतील पोते चोरी गेले आहेत आणि चोर घाटातच आहेत असे त्यांना सांगितले. तात्काळ पोलिसांची गाडी आरोपीच्या शोधा साठी चोरी झालेल्या ठिकाणी वळणावरती गेले असता तेथे काही मैद्याची पोते व काही हळदीचे पोते दिसून आले. थोडे पुढे जाऊन तपास केला असता झुडपांमध्ये हळदीचे व मैद्याचे पोते दिसून आले. यावरून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले.
चोरीच्या गुन्हे वरून तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून यात दोन धारूर येथील आहेत तर एक मोहखेड येथील आहे. ट्रक चालक रविंद्र पांडुरंग अंडील यांच्या फिर्यादीवरून भा.द.वि. 379 नुसार तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धारूर येथील पोलिस (Police) कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत अवघ्या एक तासात मुद्देमालासह आरोपी ताब्यात घेतले आहेत. यात पोलीस उपनिरीक्षक गोविंद बाष्टे, जमादार सय्यद खलील, चालक गोरख खाडे, होमगार्ड मैंद यांचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेखा धस यांनी अभिनंदन केले आहे.