ट्रक व जिपची समोरासमोर धडक ; धारुर तालुक्यातील दोन युवक जखमी.

केज दि. 13 जुलै – ट्रक व जिपची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात (Accident) धारुर तालुक्यातील दोन युवक जखमी झाले आहेत. सदर अपघात आज दि.13 बुधवारी पहाटे चारच्या सुमारास झाला. या अपघातात बोलेरो जिपचा चक्काचूर झाला असून एका गंभीर जखमीला उपचारासाठी लातूरला (Latur) हलवण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग (National Highway) क्र 548 सी वरील साळेगाव ता. केज परिसरात शंकर विद्यालयाजवळ बुधवारी (दि. 13) पहाटे 4 वाजता हा अपघात झाला. बोलेरो जीप क्र (एमएच-20/डिजे- 9563) या गाडीला ऊस बगॅसची वाहतूक करणाऱ्या ट्रक (एमएच-09/सिए-4590) ने समोरून जोराची धडक दिली. यात बोलेरो जीप चालक सोनू अन्सारी शेख (वय 25) व नशीर बशीर शेख (वय 36) दोघे रा. थेटेगव्हाण ता. धारूर हे गंभीर जखमी झाले आहेत. संबंधित जखमींवर अंबाजोगाई आणि लातूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
अपघातानंतर ट्रक चालकाने रुग्णवाहिका (Ambulance) आणि पोलीसांशी (Police) संपर्क साधून जखमीला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे दाखल केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector) शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजू गुंजाळ यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला आहे. दरम्यान ट्रक चालक रविंद्र महादेव रुपनर रा. नातेपुते ता. माळशिरस जि. सोलापूर याच्यासह अपघातातील ट्रक केज पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील कारवाई पोलीस करीत आहेत.
( Truck and jeep collide head-on; Two youths from Dharur taluka were injured. )