अंबाजोगाईत पुन्हा लाचखोरीचा प्रकार; फौजदार लाचलुचपत विभागाच्या ताब्यात.

अंबाजोगाई दि.11 मे – अवघ्या बारा दिवसांपुर्वी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना लाचखोरीच्या आरोपात कारवाई झाल्यानंतर आज पुन्हा एक फौजदार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याची घटना घडली. आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी अंबाजोगाई येथे कार्यरत असलेल्या फौजदाराला जेरबंद करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार व त्यांच्या मित्राला एका गुन्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाई स्थानिक गुन्हे शाखा बीडला न करता येथेच अंबाजोगाई तहसील मध्ये करुन देतो असे सांगून 50 हजार रु. लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 40 हजार रुपये देण्याचे ठरले. परंतु तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बीड एसीबीकडे तक्रार केली. लाच स्विकारण्याचे मान्य केले म्हणून आज दुपारी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गोपाळ सुर्यवंशीवर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपाळ दिगंबर सुर्यवंशी ( पोलीस उपनिरीक्षक अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे ) असे लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झालेल्या फौजदाराचे नावं आहे. सदरील कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक बीड विभागाचे पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे, पोलीस अमंलदार सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, हनुमान गोरे, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, चालक गणेश म्हेत्रे यांनी केली.
29 एप्रिल रोजी दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई…
अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याची घटना दि.29 एप्रिल रोजी अंबाजोगाईत (Ambajogai) घडली होती.
एका 74 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीवरुन आरोपी लोकसेवक नितीन चंद्रकांत चौरे, वय 33 वर्षे, व्यवसाय-नोकरी, वर्ग -3, पोलीस नाईक, अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन (Police Station), अंबाजोगाई जि. बीड. व प्रमोद प्रताप सेंगर (ठाकूर), वय 51 वर्षे, सहा.पोलीस उपनिरीक्षक, ने. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन, अंबाजोगाई, जि. बीड यांना सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले होते.
यानंतर आज पुन्हा पोलिस कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. या दोन्ही प्रकारात आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी लाच मागितल्याचा प्रकार आहे. जामीनासाठी मोठी रक्कम आरोपीकडून उकळली जात असल्याचे यावरुन सिध्द होत आहे. गेल्या काही दिवसांत पोलिसांच्या लाचखोरीचे प्रकार चव्हाट्यावर येत आहेत. दिवसेंदिवस वाढणारी लाचखोरी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
( Type of bribery again in Ambajogai; In the possession of the Criminal Bribery Department. )