पतीची मालमत्ता बळकाण्यासाठी पत्नीचा प्रताप; नगरसेविकेसह सात जणांविरुद्ध गुन्हा.

उदगीर दि.17 जुन – प्रॉपर्टी हडप करण्याच्या उद्देशाने जिवंतपणीच पत्नीने पतीचा मृत्यू झाल्याचे दाखवत मृत्यूचे प्रमाणपत्र काढले. खोटे मृत्यू प्रमाणपत्र काढल्याच्या आरोपावरून उदगीर शहर पोलिसांनी (Police) गुरुवारी पत्नीला अटक केली आहे. या प्रकरणात मृत्यू प्रमाणपत्र देणाऱ्या एका नगरसेविकेसह (corporator) सात जणांविरुद्ध उदगीर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
उदगीर शहराच्या विकासनगर येथील परमेश्वर सुभाष केंद्रे यांचा विवाह चापोली (ता. चाकूर) येथील रामदास किशनराव चाटे यांची मुलगी राजश्री सोबत 11 मे 2011 रोजी झाला होता.2015 साली पती परमेश्वर केंद्रे यांच्या वडिलांचे निधन झाले. 2019 साली भावाचे तर 2020 मध्ये आईचे निधन झाल्यानंतर पती परमेश्वर व पत्नी राजश्री यांच्यात बेबनाव सुरू झाला व पत्नी राजश्री माहेरी निघून गेली.
या काळात पत्नी राजश्री हिने पती परमेश्वर केंद्रे यांच्या नावावर असलेली मालमत्ता (property) बळकावण्याच्या उद्देशाने पतीचा मृत्यू झाल्याची बतावणी करून उदगीर नगरपालिकेत पतीच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्ज केला. यासाठी एका नगरसेविकेने पती परमेश्वर याचा मृत्यू झाला असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. हे मृत्यू प्रमाणपत्र (Death certificate) घेवून पत्नी राजश्री हिने न्यायालयात वारसा प्रमाणपत्र (Certificate of Inheritance) काढण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
याची कुणकुण पती परमेश्वर याला लागली. त्याने पडताळून पाहिले असता सदर प्रकार निदर्शनास येताच त्यांनी शहर पोलिसात पत्नी, मयत प्रमाणपत्र देणारी नगरसेविका व यावर सह्या करणारे पाच पंच अशा सात जणांविरुद्ध रितसर फिर्याद दिली होती. नगरसेविकेस यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. मात्र मुख्य आरोपी असलेली पत्नी राजश्री हिस गुरुवारी पोलिसांनी अटक केली.
( Wife’s splendor to seize husband’s property; Crime against seven persons including corporator. )