चिंताजनक … राज्यात म्युकरमायकोसिसचे 8 हजार 184 रुग्ण; 764 मृत्यू.

पुणे दि.26 जून – कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्यात कोरोना पश्चात नवीन संकटांचा सामना करावा लागत आहे. नवीन डेल्टा प्लसचा धोका व्यक्त करतानाच आरोग्य विभागाकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसचे 8184 रुग्ण आढळली आहेत.
(Worrying … 8 thousand 184 patients of mucormycosis in the state; 764 deaths.)
कोरोना पाठोपाठ आता म्युकरमायकोसिसचे (mucormycosis) रुग्ण राज्यात वाढत असून, राज्यात आतापर्यंत 8 हजार 184 रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक नागपूर आणि पुणे जिल्ह्यांत या आजाराचे रुग्ण आहेत. म्युकरमायकोसिसने राज्यात आतापर्यंत 764 जणांचा मृत्यू झाला असून, हा मृत्यू दर (Death rate) 9.34 टक्के इतका आहे. तर 4 हजार 407 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मागील सव्वा वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आले आहे. पण, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना म्युकरमायकोसिस या नवीन आजाराने डोके वर काढल्यामुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. नागपुर (Nagpur) व पुण्यात (Pune) या आजाराचे रुग्ण जास्त आहेत.
पहिल्या दिवसापासून नागपूर जिल्ह्यात या आजाराचे रुग्ण वाढत असून, आता 34 जिल्ह्यांमध्ये हे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात सापडले आहेत. नागपूर (Nagpur) जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 307 रुग्ण सापडले असून, त्यातील 104 जणांचा मृत्यू, तर 623 रुग्ण बरे झाले. सध्या 566 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे (Pune) जिल्ह्यात 1 हजार 217 रुग्ण सापडले असून, त्यातील 93 जणांचा मृत्यू झाला, तर 238 रुग्ण बरे झाले असून, 882 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यात सर्वांत कमी 11 रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये पालघरमध्ये 5, तर रत्नागिरीमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी असली, तरी तेथील मृत्युदर (Death rate) जास्त असल्याचे दिसून येते.