धारुर… 15 ते 18 वर्ष वयोगटाचे विक्रमी लसीकरण; राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

किल्लेधारूर दि.5 जानेवारी – तालुक्यात दि.3 जानेवारी पासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण (Vaccination) सुरु करण्यात आले आहे. यात पहिल्या दिवशी (दि.3) तालुक्यातील 629 तर दुसऱ्या दिवशी (दि.4) 678 मुलांनी लसीकरण केले. यात काल दि.4 मंगळवारी धारुर महाविद्यालयात राष्ट्रवादी युवती काँग्रेस आयोजित लसीकरण शिबीरात 328 मुलांनी लसीकरण करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
(Dharur … Record vaccinations for 15 to 18 year olds; Spontaneous response to the NCP Yuvati Congress camp.)
धारुर तालुक्यात दि.3 सोमवारी पासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. सोमवार (दि.3) रोजी धारूर तालुक्यामध्ये 629 जणांचे लसीकरण झाले. या मध्ये सरस्वती विद्यालय तेलगाव व लोकशक्ती शाळा देवदहिफळ यांचा समावेश आहे.
मंगळवार (दि.4) रोजी 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून (NCP) तालुकाध्यक्ष विशाखा गायकवाड यांच्या वतीने कोविड-19 लसीकरण (Corona vaccine) कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या लसीकरण कार्यक्रमा अंतर्गत कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय किल्लेधारूर येथे 328 जणांचे लसीकरण झाले.
धारूर (Dharur) तालुक्यात 15 ते 18 या वयोगटातील एकूण 5781 लाभार्थी आहेत. आरोग्य विभागाचे दि.10 पर्यंत 15 ते 18 या वयोगटातील 100% लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी (Taluka Health Officer) डॉ. शहाजी लोमटे यांनी दिली.
काल (दि.4) झालेल्या 15 ते 18 वयोगटातील लसीकरणात ग्रामीण भागातील मोहखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात 153 तर भोगलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात 185 जणांनी लसीकरण केले. पहिल्या दिवशी 629 तर दुसऱ्या दिवशी 678 असे एकुण 1307 जणांनी विक्रमी लसीकरण केले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शहाजी लोमटे यांनी दिली.