यंदा महाराष्ट्राला ५७ पोलिस पदक…. बीडच्या आर. राजांचाही समावेश

मुंबईः दि.२६ जानेवारी- प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारकडून देशातील पोलिसांच्या शौर्याचे गौरव व सन्मान करण्यासाठी पोलीस पदक जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातील ५७ पोलिसांचा गौरव प्रजासत्ताक दिनी होणार असून यात ४ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक, १३ जणांना पोलीस शौर्य पदक तर ४० जणांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक देऊन सन्मानित केले जाणार आहे. महाराष्ट्राने (Maharashtra) ५७ पदके मिळवत यावर्षी देशात तिसरं स्थान मिळवले आहे. बीडचे (Beed) पोलिस (Police) अधिक्षक आर. राजा यांनाही शौर्य पदक देवून गौरविण्यात येणार आहे.
ठाणे गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त निवृत्ती उर्फ एन.टी. कदम यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या पोलीस उपअधीक्षक संगीता शिंदे यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पदक जाहीर झाले. तर भिवंडीतील निजामपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय डोळस, पोलीस मुख्यालयातील सहा.पो. उपनिरीक्षक थॉमस डिसुझा, गुन्हे शाखेचे सहा.पो. उपनिरीक्षक सुरेश मोरे आणि खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस पदक जाहीर झाले आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याने यंदा सर्वाधिक पदके मिळवली आहेत. २०१८ मध्ये माओवादविरोधी कारवाईत कसनासूर बोरियाच्या चकमकीत ३८ माओवादी ठार झाले होते, त्या कारवाईचे नेतृत्व करणारे तत्कालीन माओवादविरोधी अभियानाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हरी बालाजी (सध्या अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक) तसेच प्राणहीता पोलीस उपमुख्यालयाचे तत्कालीन अतिरिक्त अधीक्षक आर. राजा (बीड (Beed) येथे पोलीस अधीक्षक) या दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सी-६० कमांडो पथकाच्या जवानांना पोलिस (Police) शौर्य पदके जाहीर झाली आहेत. याशिवाय एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस हवालदार तसेच ५ पोलीस नाईक आणि ३ पोलीस अमलदार यांचा यात समावेश आहे. यंदा देशातील ९४६ जणांना पोलीस पदके जाहीर झाली आहेत. यात ८९ पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’, २०५ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ आणि ६५० पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ आणि दोन ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाली आहेत. यामध्ये उत्तरप्रदेश पोलिसांना ८ शौर्य, ७ उल्लेखनीय सेवा तर ७२ गुणवत्तापूर्ण सेवेची अशी एकूण ८७ पदके मिळाली आहेत. तर जम्मू आणि काश्मीर पोलिसांना ५२ शौर्य, २ उल्लेखनीय तर १७ गुणवत्तापूर्ण सेवेची अशी एकूण ७१ पदके मिळाली आहेत. तर महाराष्ट्राला (Maharashtra) एकूण ५७ पदक मिळाली आहेत. याशिवाय ३२ राज्याच्या पोलीस दलात सिक्कीम, पुद्दुचेरी, अंदमान-निकोबार आणि चंदीगडला प्रत्येकी एक (गुणवत्तापूर्ण सेवा) पदक मिळाले आहे.