माजलगावात लाचखोर अधिकारी सापळ्यात अडकला; लाचलुचपत विभागाची कारवाई.

माजलगाव दि.6 जुन – माजलगाव पंचायत समिती कार्यालयात कार्यरत विस्तार अधिकाऱ्यास पाच हजारांची लाच स्विकारताना बीड लाचलुचपत विभागाच्या (Anti Corruption Bureau) पथकाने रंगेहात पकडले. सदर कारवाई आज दि.6 सोमवारी पंचायत समिती कार्यालयासमोर करण्यात आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, येथील पंचायत समिती कार्यालयात पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले रामचंद्र होनाजी रोटेवाड (वय 30) यांनी तक्रारदाराकडे सेवा ज्येष्ठता यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती पाच हजार रुपये तक्रारदाराकडून स्विकारण्याचे मान्य केले. सदर तक्रारदार हे केसापुरी येथे लिपिक पदावर कार्यरत असून सेवेची दहा वर्ष पुर्ण केली आहेत.
दहा वर्ष पुर्ण झाल्याने सेवा ज्येष्ठता यादीत समावेश करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्याचा मोबदला म्हणून पाच हजार रुपये लाच स्विकारताना त्यांना पंचायत समिती कार्यालयासमोर पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले. हि कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक ( ACB ) विभागाचे पोलिस अधिक्षक राहुल खाडे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक विशाल खांबे, पोलिस उपाधिक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक अमोल धस, पोलिस अंमलदार भरद गारदे, श्रीराम गीराम, अमोल खरसाडे, अविनाश गवळी यांच्या पथकाने केली.
( In Majalgaon, a corrupt official was caught; Bribery department action. )