केंद्रेवाडीत गुढ आवाज; आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा फोडला…. आ. सोळंके यांचे आवाहन.

अंबाजोगाई/किल्लेधारूर दि.7 सप्टेंबर – अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथे सोमवार (दि.6) दुपार पासून गुढ आवाज येत आहेत. यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. भूकंप होतो की काय या धास्तीने नागरिकांनी सोमवारी रात्र जागून काढली. या आवाजाने गावात खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर धारुर तालुक्यातील फुटण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा फोडून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. आ. प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) यांनी तलाव क्षेत्रातील ग्रामस्थांना कोणत्याही भुलथापांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
(Mysterious sound in Kendrawadi; Drainage of Aranwadi storage lake burst …. Solanke’s appeal.)
अंबाजोगाई (Ambajogai) ते आडस रोडवर केंद्रेवाडी हे गाव आहे. या गावात सोमवार दुपारपासून गावाच्या चारही बाजूंनी गुढ आवाज येत आहे. दूर तोफ वाजवील्यानंतर आकाशात जसा आवाज येतो तसा आवाज केंद्रेवाडी गावात येत आहे. या गुढ आवाजाने (Mysterious sound) नागरीक भयभीत झाल्याचे गावातील नागरिक पप्पू केंद्रे, रामेश्वर केंद्रे, ब्रह्मदेव तरकसे, सुखदेव केंद्रे, नितीन केंद्रे, सुरेश तरकसे यांनी सांगितले.
सोमवार दुपार पासून केंद्रेवाडी गावात गुढ आवाज येत असल्याचे नागरिकांनी फोनवर कळविले आहे. ही माहिती प्रशासनाला दिली असून मंगळवारी मी प्रत्यक्षात गावात भेट देऊन चौकशी केली असुन तहसीलदार विपिन पाटील यांना माहिती दिली असुन बीड (Beed) येथील भूगर्भ शास्त्रज्ञ (Geologist) यांना पाचारण केले आहे ते रात्री पाहाणी करणार असल्याची माहिती केंद्रेवाडीच्या तलाठी माधुरी स्वामी यांनी दिली.
आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा फोडला.
गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे धारुर (Dharur) तालुक्यातील आरणवाडी साठवण तलाव (Aranwadi storage pond) ओसंडून भरले आहे. यातच तलावाच्या भिंती खचल्याने तलाव फुटण्याची भिती निर्माण झाली. यामुळे लघूपाटबंधारे विभागाने (irrigation department) तलावाचा सांडवा फोडण्याचा निर्णय घेतला. तत्पुर्वीच तलावाच्या खालील नदीकाठची काही कुटूंबांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. आज दुपारी पोकलेनच्या सहाय्याने तलावाचा सांडवा फोडून पाण्याचा विसर्ग वाढवण्याचे काम प्रशासनाकडून युध्द पातळीवर सुरु करण्यात आले.
आ. प्रकाशदादा सोळंके यांचे आवाहन.
आरणवाडी तलाव क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक वाढल्याने तलावातील पाणी पातळी वाढली आहे, सदर प्रकल्पाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने पाणी पातळी क्षमता केवळ 70 ते 80 टक्के असायला हवी परंतु पाणी पातळी क्षणाक्षणाला वाढतच जात असल्याने धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा सांडवा फोडण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वीही लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला होता, परंतु काही लोकांनी राजकीय भांडवल करत स्वतःच्या “स्वार्थापोटी” चुकीची माहिती,अफवा पसरवून लोकांची दिशाभूल केली. आज अतिवृष्टीमुळे (heavy rains) परत सांडवा फोडण्याचा निर्णय घेण्याची वेळ प्रशासनावर आली आहे आणि हा निर्णय केवळ त्या क्षेत्रातील गावांना धोका निर्माण होऊ नये यासाठी घेण्यात येत आहेत त्यामुळे परिसरातील लोकांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी केले.