शेतकऱ्यांसाठी पंधरा दिवस चिंतेचे; अॉक्टोंबर हिटसह मुसळधार पाऊस.

मुंबई दि.3 अॉक्टोंबर – सप्टेंबर महिन्यापासून मराठवाडा, विदर्भात पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, गेले दोन-तीन दिवस ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे. शनिवारी पहाटे औरंगाबादेत अर्ध्या तासात तब्बल 51.2 मिमी एवढा पाऊस कोसळला. बीड (Beed), परभणी, श्रीगोंदा, चाळीसगाव येथेही पावसाने थैमान घातले आहे. पुढील पंधरा दिवस शेतकऱ्यांना अॉक्टोंबर हिटसह (October hits) मुसळधार पावसाचाही (heavy rains) सामना करावा लागू शकतो असा अंदाज हवामान तज्ञ (Meteorologist) व्यक्त करत आहेत.
(Fifteen days of concern for farmers; Heavy rain with October hits.)
उष्णतेतील वाढीला जमिनीतून मिळणारी आर्द्रता, त्यामुळे दुपारनंतर कम्युलस ढगांची (Cumulus clouds) निर्मिती होते. हे ढग उंचावर गेल्यावर त्यांना गारवा मिळून कमी वेळेत जोरदार पाऊस पडत असल्याचे ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले. वातावरण बदलामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या 15 दिवसांत असा पाऊस पडतो. हा शेतीसाठी उपयोगी नसतो. डॉ. कुलकर्णी म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून परतीचा पाऊस लांबला आहे.
ऑक्टोबर अखेर काही वेळेस शहराच्या एका भागात जोरदार पाऊस तर इतर भागात पाऊस नसतो. मान्सूनची माघार लांबल्याने ऑक्टोबरचा पहिल्या 15 दिवसांत वादळी वाऱ्यासह जाेरदार पाऊस होत असतो. तसा तो सध्या होत आहे. अजून 15 दिवस असा पाऊस होऊ शकतो, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले.
ऑक्टोबरमध्ये सूर्याची किरणे सरळ रेषेत येत असतात. ज्याला आपण ऑक्टोबर हिट म्हणतो. आकाशातील ढगांचे आच्छादन कमी झालेले असते. त्यामुळे ही किरणे थेट जमिनीवर येतात. त्यात जमिनीमध्ये अजून भरपूर आर्द्रता असते. ऑक्टोबरमध्ये कमी जागेत उंच ढगांची निर्मिती होते. सूर्याच्या उष्णतेमुळे कम्युलस ढगांची निर्मिती होऊन दुपारनंतर असा जोरदार पाऊस पडतो, असे जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले.
मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
03 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद (Aurangabad), जालना, परभणी, हिंगोली व बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 04 ऑक्टोबर रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बीड व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
05 ऑक्टोबर रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातुर व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची तर औरंगाबाद व जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच 06 ऑक्टोबर रोजी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर (Latur) जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. के. के. डाखोरे यांनी दिली आहे.