धारुरच्या ‘त्या’ अपघातग्रस्त तरुणाचा मृत्यू; गावात शोककळा.

किल्ले धारूर दि.19 मार्च – बुधवारी कोळपिंपरीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे शुक्रवारी (दि.18) रोजी रात्री 11.30 च्या सुमारास लातूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले.
आडस-धारुर (Dharur) रस्त्यावर दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात (Accident) दोन दुचाकीवरील दोघे जखमी होते. यातील जितेंद्र काटे रा. खोडस ( ता. धारुर ) हा गंभीर जखमी होता. त्याच्यावर लातूर येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता जितेंद्रची प्राणज्योत मालवली. तरुणाच्या अपघाती निधनामुळे खोडस ता. धारुर या गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
बुधवारी (दि.16) मार्च सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आडस-धारुर रस्त्यावरील कोळपिंप्री शिवारातील गायरान जवळील वळणावर दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला होता. यामध्ये पोटे नवनाथ तुकाराम रा. चाटगाव ( ता. धारुर ) व जितेंद्र नामदेव काटे रा. खोडस ( ता. धारुर ) हे जखमी झाले.
या दोघांनाही प्रथम अंबाजोगाई (Ambajogai) येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जितेंद्र काटेची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी लातूर येथील एका खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले. येथे जितेंद्रवर उपचार सुरू होते.
डोक्याला मागील बाजूला मेंदूला जबर मार लागून कवठी फुटल्यामुळे तरुण बेशुद्ध अवस्थेत होता. यानंतर तरुणाला शेवट पर्यंत शुध्द आलीच नाही. लातूर (Latur) येथेच उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या अकाली मृत्यूच्या घटनेने खोडस येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. जितेंद्र काटे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.
(The death of ‘that’ accidental youth of Dharur; Mourning in the village.)