बिबट्याची दहशत… धारुर तालुक्यात याभागात आढळले पायाचे ठसे.

किल्लेधारूर दि.17 नोव्हेंबर – तालुक्यातील मौजे कान्हापुर येथील ग्रामस्थांनी बिबट्या (Leopard) सदृश्य वन्यप्राणी पाहिल्याची माहिती मिळताच धारुर वनपरिक्षेत्र विभागाच्या (Forest Department) कर्मचाऱ्यांनी सोमवारी परिसराची पाहणी केली. यानंतर लगेच दिंद्रुडसह देवदहिफळ, संगम, चाटगाव, बाबळगाव, भोपा व परिसरातूनही अशी माहिती आली असून समाजमाध्यमातून बिबट्याच्या पायाचे ठसे (footprints) आढळल्याची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. वनविभागाच्या पथकाने रात्री याभागाचाही दौरा केला.
(Leopard terror in this part of Dharur taluka too … found footprints?)
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धारुर (Dharur) तालुक्यातील कान्नापुर गावाच्या शिवारात काही ग्रामस्थांनी बिबट्या पाहिल्याची माहिती दिल्यावरुन दि.16 मंगळवार रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी यु.एच.चिकटे व वनपरिमंडळ अधिकारी एस.जी.वरवडे यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 7.30 वाजता मौजे कान्हापुर ता.धारुर येथे सदर मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी मोहखेडचे वनरक्षक एम.एम.सावंत व वनकर्मचारी एस.डी.पारवे, बी.व्ही.राऊत, ए,व्ही.वाल्हे, के.एन.सोळंके, शाम गायसमुद्रे यांच्या पथकाने दौरा करुन परिसर पिंजून काढला.
पथकाने मिळालेल्या माहिती प्रमाणे आशोक बाबुराव देशमुख यांच्या मालकीच्या शेतात स.नं.356 मध्ये जाऊन त्यांनी दाखविलेल्या क्षेत्राची पहाणी केली. मात्र या पाहणीत तेथे कोणत्याही वन्यप्राण्याच्या पाउलखुणा दिसुन आल्या नाहीत. सदरील प्रकारावर हा प्राणी तरस असण्याची शक्यता वर्तवली होती.
यातच काल सांयकाळी समाजमाध्यमातून (Social Media) “देवदहिफळ, दिंद्रुड, संगम, चाटगाव, बाबळगाव, भोपा व परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे कृपया संध्याकाळी कोणीही शेतात जाऊ नका आपली स्वतःची व आपल्या जनावरांची काळजी घ्या कारण आमच्या शेतामध्ये उकळपट्टी मध्ये बिबट्यांच्या पायाचे ठसे आढळून आलेले आहेत तरी सर्वांनी काळजी घ्यावी ही नम्र विनंती, यात प्रशासन व वन विभाग यामध्ये सहकार्य करीत आहे. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी एकट्याने संध्याकाळी कोणीही घराबाहेर पडू नये ही प्रशासनाच्या वतीने सर्वांना नम्र विनंती” असा संदेश व्हायरल झाला.
याची दखल घेत रात्री 8.30 ते 10 वाजण्याच्या दरम्यान वन विभागाच्या पथकाने त्या भागाचा दौरा केला. परिसरात पाहणी केल्यानंतर वन्यप्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले. मात्र सदरील पायाचे ठसे हे तरस या वन्यप्राण्याचे असल्याचा खुलासा वनविभागाने केला. वनपरिमंडळ अधिकारी एस.जी.वरवडे यांच्याशी संपर्क केला असता तो प्राणी बिबट्या नसून तरस असल्याचा दुजोरा दिला. ग्रामस्थांनी भिती बाळगू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, देवदहीफळ येथे माजी उपसरपंच बाबुराव बडे यांच्या शेतात आज सकाळी दोन शेळ्यांचा अज्ञात वन्यप्राण्याने फडशा पाडल्याचे निदर्शनास आले. यामुळे तो प्राणी बिबट्याच असण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली असून परिसरात भितीचे वातावरण आहे.