भाजपाच्या ‘अंगण हेच रणांगण’ आंदोलनाचा राष्ट्रवादी डॉक्टर सेलकडून जाहीर निषेध
डॉ.नरेंद्र काळे यांची सोशल माध्यमातून टिका

अंबाजोगाई दि.२१(प्रतिनिधी) संपूर्ण विश्व कोरोनासारख्या महाभयंकर संकटाशी लढत असताना भाजपा २२ मे रोजी राज्य सरकारच्या विरोधात काळे झेंडे दाखवून ‘अंगण हेच रणांगण’ असे आंदोलन करणार आहे. या आंदोलनात काळे कपडे, काळे मास्क व काळे झेंडे वापरण्याच्या सूचना देखील भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी चंद्रकांत पाटील आणि भाजपावर टीका केली आहे.
कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या सर्वच योद्ध्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि रुग्णांसाठी मास्क, व्हेंटिलेटर, एन ९५ मास्क आणि पीपीई कीट यावरील जीएसटी रद्द करण्याची मागणी समस्त वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलकडून केंद्राकडे वारंवार करण्यात आली. जीएसटीचा विषय केंद्राकडे आहे. मात्र, भाजपाच्या एकाही नेत्याने वा पदाधिकाऱ्याने याविषयी एकही शब्द काढलेला नाही. वास्तविक याविषयी भाजपाने पाठपुरावा करणे आवश्यक होते, असेही डॉ. नरेंद्र काळे यांनी म्हटलेय. यापूर्वी एन ९५ मास्क, पीपीई कीट यांच्या किंमती नियंत्रीत करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलनेकेली होती. त्याची दखल घेत राज्य सरकारने याबाबत नॅशनल फार्मासुटीकल प्रायसिंगकडे मागणी केली आहे. त्यामुळे ही मागणी राज्यातील भाजप नेत्यांनी देखील करणे आवश्यक होते. परंतु, भाजपा काळे झेंडे आंदोलनाद्वारे राजकारण करत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असणाऱ्या रेड झोन भागात आतापर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस किंवा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली, असे पाहण्यात आलेले नाही. त्यामुळे आंदोलन करण्याऐवजी दोघांनी या भागात जाऊन कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या योद्ध्यांच्या पाठीवर थाप मारा, त्यांचे अभिनंदन करा आणि केंद्राकडे प्रलंबित असणाऱ्या मागण्यांचा पाठपुरावा करा, असे मत डॉ. नरेंद्र काळे यांनी व्यक्त केले आहे.