धक्कादायक…. लातूर नंतर वाशिममध्ये आढळले एकाच निवासी शाळेत २२९ विद्यार्थी पॉझिटीव्ह…

वाशिम : दि.२५- लातूर मधील एका शाळेत ४५ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजी असताना वाशिम (Washim) जिल्ह्यातील एका आदिवासी निवासी शाळेमधील तब्बल २२९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
(Shocking …. After Latur, 229 students found positive in the same residential school in Washim …)
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाशिम (Washim) जिल्ह्यातील देगाव परिसरात एक आदिवासी निवासी शाळा (Residential school) आहे. या शाळेतील ३२७ विद्यार्थी १४ फेब्रुवारीला शाळेत दाखल होते. या सर्व विद्यार्थ्यांची RTPCR चाचणी करण्यात आली होती. या चाचणीनंतर २२९ विद्यार्थ्यांस कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांसह चार कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. कोरोना झालेले बहुतांश विद्यार्थी हे १३ ते १५ वयोगटातील आहेत. तसेच बहुतांश विद्यार्थी हे अमरावती जिल्ह्यातील धारणी, अचलपूर आणि मेळघाट या आदिवासी पट्टयातील रहिवासी आहेत. कोरोनाबाधित आढळलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना थोड्या फार प्रमाणात सर्दीचे लक्षणे होती. उर्वरित विद्यार्थ्यांना मात्र कोणतेही लक्षणे अथवा त्रास जाणवत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
कोरोना बाधित (Corona Positive) विद्यार्थ्यांना योग्य उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाने डॉक्टरांसह दोन आरोग्य पथके २४ तास तैनात ठेवावीत. या पथकाने सर्व विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान, ऑक्सिजन पातळीची तपासणी करावी. तसेच त्यांना इतर काही लक्षणे असल्यास त्याची तपासणी करून त्यानुसार तातडीने उपचार करावेत. शाळा व्यवस्थापनाने सुद्धा कर्मचाऱ्यांचे एक पथक २४ तास तैनात ठेवावे. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होत असल्यास तातडीने आरोग्य पथकाच्या निदर्शनास आणून द्यावे. सर्व विद्यार्थ्यांना वेळेवर व योग्य आहार मिळेल याची खबरदारी घ्यावी. कोणत्याही विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या आहेत.
एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळल्यानंतर या शाळेचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र (कन्टेन्मेंट झोन) म्हणून घोषित करण्यात आला आहे. कोरोना पॉझिटीव्ह आढळलेले सर्व विद्यार्थी शाळेच्या वसतिगृहात निवासी स्वरुपात राहणारे आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १५१, यवतमाळ जिल्ह्यातील ५५, वाशिम जिल्ह्यातील ११, बुलडाणा जिल्ह्यातील ३, अकोला जिल्ह्यातील १ तर हिंगोली जिल्ह्यातील ८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
दरम्यान शाळेमध्ये निवासी स्वरुपात राहणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी निगेटिव्ह आहेत, त्यांची संपूर्ण व्यवस्था स्वतंत्र ठेवावी. तसेच बाधित आढळलेल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेले इतर स्थानिक विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी तातडीने करून घ्यावी. यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या आहेत.